SSC HSC result link जिल्हा परिषदांच्या शाळांसह मराठी माध्यमांच्या शाळांमधील पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सीबीएसई व सेमी इंग्रजीकडे पालक-विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. या पार्श्वभूमीवर आता पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा- प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले जाणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व परिषदेकडून त्यासंबंधीचा कृती आराखडा तयार केला जात आहे. विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी होऊन परीक्षा काळातील त्यांची घोकंपट्टी थांबेल, अशा प्रश्नपत्रिका असणार आहेत.
केंद्र व राज्य मंडळाच्या माध्यमातून ‘यशदा’कडून बोर्ड परीक्षेच्या प्रश्नपत्रिका काढणाऱ्या विषयतज्ज्ञांचे (पेपर सेटिंग करणारे शिक्षक) नुकतेच प्रशिक्षण पार पडले आहे. सध्या पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनदा शाळा स्तरावर अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा (चाचण्या) होतात. त्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर काढल्या जातात, मूल्यमापनही शाळाच करतात. त्यात पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची ढकलपास पद्धत बंद होऊनही सगळेच विद्यार्थी उत्तीर्ण होतात. दुसरीकडे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाकडून वार्षिक परीक्षा घेतली जाते. पण, या प्रचलित पद्धतीत आता खूप बदल होणार असून एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या (पहिली ते नववी) उत्तरपत्रिका दुसऱ्या शाळांमधील शिक्षक तपासतील, असा बदल अपेक्षित आहे. २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासूनच बदलानुसार कार्यवाही केली जाणार आहे.
सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये अन्य विषयांचेही प्रश्न
पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांच्या गणित, इंग्रजीचे प्रश्न विज्ञान, इतिहास-भूगोल किंवा विज्ञान, भूगोल-इतिहास विषयाच्या प्रश्नपत्रिकेत इंग्रजी, गणितावर आधारित प्रश्न असतील. जेणेकरून विद्यार्थी त्यांच्याकडील सरळज्ञान, समज, ज्ञानाचा वापर करून विचारपूर्वक उत्तर लिहू शकतील. घोकंपट्टीपेक्षा विद्यार्थ्यांकडील प्राप्त ज्ञान, माहितीचाच अधिकाधिक वापर उत्तरे लिहायला होईल, असे प्रश्नपत्रिकांचे स्वरूप राहणार आहे.
बदल गुणवत्ता वाढीसाठी महत्त्वाचा असेल
पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा व प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलणार असून त्यादृष्टीने कृती आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. परीक्षा काळातील अभ्यासाचा ताण, घोकंपट्टी थांबावी हा त्यामागील प्रमुख हेतू असून सरळ ज्ञान, समज, यावर प्रश्न असतील.
– राहुल रेखावार, संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
दहावी-बारावीचा निकाल २२ मेपूर्वी
यंदा दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर पार पडली आहे. आता इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून पुढील आठवड्यात राज्यातील नऊ विभागीय मंडळाच्या अध्यक्षांकडून त्याची पडताळणी होऊन निकाल छपाईसाठी पाठविले जाणार आहेत. त्यानुसार १५ मेपूर्वी इयत्ता बारावीचा निकाल जाहीर होईल. तर दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल २० ते २२ मेपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.